“मराठी भाषेची शुद्धता जपा – प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांचे प्रेरणादायी आवाहन”

0
37

धामणगाव रेल्वे | दिनांक : २७ फेब्रुवारी २०२६

स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण व सांस्कृतिक वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. हा दिवस महान साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. त्यांच्या साहित्यसेवेच्या स्मरणार्थ कार्यक्रमात त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रचिती धर्माधिकारी होत्या .

कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती पूजनाने करण्यात आली. मराठी शिक्षिका अश्विनी शेंडे यांनी ओघवत्या व प्रभावी शब्दांत सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला आकर्षक रंगत आणली.

इयत्ता ८ वीची विद्यार्थिनी चैतन्या डहाके हिने मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेवर प्रभावी भाषण करत उपस्थितांची मने जिंकली, तर इयत्ता ३ रीची विद्यार्थिनी अनवी काळे हिने निरागस व आत्मविश्वासपूर्ण शब्दांत आपल्या मायमराठीबद्दलचे प्रेम व्यक्त केले. दोन्ही विद्यार्थिनींच्या वक्तृत्वाचे उपस्थितांकडून मनापासून कौतुक करण्यात आले.

मराठी विभाग प्रमुख स्नेहा सोनटक्के यांनी मराठी भाषेचा गोडवा, तिचे सांस्कृतिक वैभव आणि अभिजात परंपरा अधोरेखित करणारी सुंदर कविता सादर करून कार्यक्रमाला भावपूर्ण स्वरूप दिले.

अध्यक्षीय भाषणात श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान बाळगण्याचे, दैनंदिन जीवनात तिचा जाणीवपूर्वक वापर करण्याचे तसेच मातृभाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “मराठी ही केवळ भाषा नसून आपली ओळख, संस्कृती आणि अभिमान आहे,” असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री तुषार रेवतकर, प्रशासकीय अधिकारी ,प्रीतेश जुनवाडे टोपाझ हाऊस प्रमुख सौरभ बोंदरे आणि स्नेहा सोनटक्के व सर्व हाऊस सदस्य , असेम्ब्ली प्रमुख गौरव देवघरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या उत्साहपूर्ण कार्यक्रमामुळे विद्यालयात मराठी भाषेबद्दल आदर, जिव्हाळा आणि अभिमानाची भावना अधिक दृढ झाली.

veer nayak

Google Ad