चांदूर रेल्वे : शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे येथील प्रा. ममता पळसपगार यांना ‘आधुनिक सावित्री पुरस्कार- २०२६’ प्रदान करण्यात आला आहे. समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आधुनिक काळात पुढे नेणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले जयंती पर्वावर बारामती येथील करिअर संसदेचे राज्यस्तरीय अधिवेशन शारदानगर येथे ३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित समारंभात हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर (संचालक, उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते आणि मा. श्री. राजेंद्र पवार (चेअरमन, ऍग्रीकल्चर डेव्हलोपमेंट ट्रस्ट, शारदानगर, बारामती), मा. डॉ. तुषाबा शिंदे (IRPS), मा. यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र), मा. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे (व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) तसेच मा. प्रो. डॉ. श्रीकुमार महामुनी (प्राचार्य, शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शारदानगर) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रा. ममता पळसपगार यांनी आपल्या पुरस्काराचे श्रेय आई-वडिलांच्या संस्कारांना दिले. तसेच संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय उत्तराताई जगताप, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
या गौरवप्राप्तीनिमित्त महाविद्यालयात अभिनंदन समारंभाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर, तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. ममता एस. पळसपगार यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची प्रतिष्ठा वाढल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांनी करिअर कट्टा परिवाराचे अध्यक्ष मान.यशवंत शितोळे,प्राचार्य प्रवर्तक, विभागीय आणि सहविभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक आणि निवड समितीचे मनःपूर्वक आभार मानत विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासाकरिता पुढेही आपले कार्य जोमाने सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.











