चांदूर रेल्वे : – (ता. प्रतिनिधी)
महाशिवरात्रीच्या पवित्र आणि भक्तिमय वातावरणात चांदूर रेल्वे शहरातील श्री चंद्रभागेश्वर महादेव देवस्थान येथे सामाजिक बांधिलकीचा आणि सर्वधर्मसमभावाचा हृदयस्पर्शी संगम पाहायला मिळाला. देवस्थानचे अध्यक्ष तथा अमरावती येथील एकता प्रॉपर्टी ब्रोकर असोसिएशनचे अध्यक्ष कैलास गिरोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त कैलास छाया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १० दिव्यांग बांधवांना रविवारी तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे चांदूरवाडी येथील दिव्यांग मुस्लिम मुलगा शेख ताहा शकील शेख यालाही सन्मानपूर्वक सायकल देण्यात आली. या उपक्रमातून धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन मानवतेचा खरा संदेश देण्यात आला. त्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर हृदयात अभिमानाची भावना दाटून आली.
दिव्यांग बांधवांच्या जीवनात गतिशीलता यावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि ते स्वावलंबी व्हावेत या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. महाशिवरात्रीच्या पुण्यपर्वावर झालेल्या या वाटपामुळे देवस्थान परिसरात सामाजिक ऐक्याचे आणि बंधुभावाचे भावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमाला ह.भ.प. देवी राधिका (वृंदावन धाम), नगराध्यक्ष प्रियंका निलेश विश्वकर्मा, नगरसेवक निलेश विश्वकर्मा, संस्थानचे कार्याध्यक्ष बच्चू वानरे (न.प. उपाध्यक्ष), सचिव डॉ. प्रशांत कोठेकर, कोषाध्यक्ष सुनील अग्रवाल, सहसचिव निलेश गुल्हाने, नगरसेवक गजानन ठाकरे, आचल प्रधान, ह.भ.प. राजेंद्र महाराज म्हस्के (बग्गी) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिलीप पडघाम (तळेगाव), प्रमोदीनी बनकर (घुईखेड), लता पोतदार (चां.रे.), अनिता लांबाडे (चां.रे.), शेख ताहा शकील शेख (चांदूरवाडी), अतुल तिखे (चां.रे.), रघुनाथ गुल्हाने (नांदगाव खं.), अजय बारबुध्दे (नांदगाव खं.), प्रकाश गाते (धामणगाव), किसना मेश्राम (धामणगाव) यांना तीनचाकी सायकल वाटप करण्यात आले. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात झालेला हा उपक्रम केवळ सायकल वाटपाचा कार्यक्रम न राहता “माणुसकीचाच खरा धर्म” असल्याचा संदेश देणारा ठरला. चांदूर रेल्वे शहराने या माध्यमातून पुन्हा एकदा सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याची उज्ज्वल परंपरा जपल्याचे दिसून आले. यावेळी छाया गिरोळकर, मयूर जिरापुरे, धनश्री जिरापुरे तसेच नातेवाईक, अमरावती येथील मित्र परिवार व असंख्य लोकांची उपस्थिती होती.














