नांदगाव खंडेश्वर येथे पाणीप्रश्नी नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांचे पत्राची ; नगराध्यक्षांकडून दखल घेत नादुरुस्त हातपंप दुरुस्तीचे आदेश

0
9
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

नांदगाव खंडेश्वर –

( तालुका प्रतिनिधी ) 

उन्हाळ्याची चाहूल लागताच नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत क्षेत्रात पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहराच्या काही प्रभागांमध्ये विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी पाणी पुरवठा सभापतींना पत्र लिहून तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. या पत्राची तातडीने दखल घेत नगराध्यक्षा प्राप्तीताई मारोटकर यांनी शहरातील नादुरुस्त हातपंप युद्धपातळीवर दुरुस्त करून घेण्याचे निर्देश देत प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

नगरसेविकेची प्रशासनाकडे धाव

नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांनी पाणी पुरवठा समितीच्या सभापतींना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सध्या शहरात पाणी पुरवठा योजनेबाबत अनेक तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक प्रभागांत पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. आगामी उन्हाळा पाहता पाणी टंचाईचे नियोजन करणे, प्रगती अहवाल सादर करणे आणि दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करणे या विषयांवर चर्चा करण्यासाठी पुढील २-३ दिवसांत विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. 

नगराध्यक्षांकडून तातडीची कार्यवाही

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्षा प्राप्तीताई मारोटकर यांनी तातडीने प्रशासकीय यंत्रणा हलवली. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागू नये, यासाठी त्यांनी शहरातील बंद अवस्थेत असलेले हातपंप तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नगर पंचायतीच्या पथकाने शहरातील विविध भागांतील नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले असून, अनेक ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.

नागरिकांकडून समाधान

पाणी प्रश्नावर नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांनी दाखवलेली तत्परता आणि नगराध्यक्षांनी केलेली तात्काळ कार्यवाही यामुळे नांदगाववासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, येणाऱ्या कडक उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

veer nayak

Google Ad