स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

0
26
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे : येथील स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन अत्यंत दिमाखदार व उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात आले. या दुहेरी पर्वाच्या औचित्याने संपूर्ण विद्यालय परिसर देशभक्तीच्या रंगांनी न्हाऊन निघाला.

कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या “जय जय महाराष्ट्र माझा” या गौरवगीताने वातावरणात महाराष्ट्राबद्दलचा अभिमान दाटून आला. गीताच्या प्रत्येक ओळीतून राज्याच्या शौर्याची व अस्मितेची जाणीव प्रकर्षाने जाणवली.

यावेळी प्राचार्यांनी आपल्या ओजस्वी, विचारप्रवर्तक व साहित्यिक भाषणातून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा इतिहास उलगडला. त्यांनी नमूद केले की, १ मे १९६० हा दिवस मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा विजयदिन आहे. भाषिक प्रांतांच्या पुनर्रचनेतून महाराष्ट्र व गुजरात ही स्वतंत्र राज्ये निर्माण झाली; मात्र या प्रक्रियेमागे असंख्य हुतात्म्यांचे बलिदान दडलेले आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन ही जनतेच्या अस्मितेची जाज्वल्य चळवळ ठरली. “मुंबई आमची” या घोषणेतून पेटलेल्या संघर्षानंतर मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाला, ही घटना इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे, असे त्यांनी सांगितले.

कामगार दिनानिमित्त त्यांनी कष्टकरी वर्गाच्या योगदानाचा गौरव करताना शेतकरी, कामगार व विविध क्षेत्रांतील श्रमिक यांच्या परिश्रमांमुळेच राष्ट्राची प्रगती शक्य होते, असे अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी परिश्रम, शिस्त, प्रामाणिकता व सामाजिक जबाबदारी या मूल्यांचा अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विज्ञान शिक्षिका पूजा शेलके यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभव, निसर्गसंपदा व प्रगती यांवर प्रभावी भाष्य केले. कार्यक्रमाचे सुबक व ओघवते संचालन त्यांनीच केले. गणित शिक्षिका ऋतुजा महात्मे यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांमध्ये महाराष्ट्राबद्दल अभिमानाची भावना जागृत केली. प्रशासकीय अधिकारी प्रीतेश जनवाडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना वेळेचे व्यवस्थापन, शिस्त व सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले.

हा कार्यक्रम केवळ औपचारिक सोहळा न ठरता विद्यार्थ्यांसाठी इतिहास, संस्कार व प्रेरणा देणारा ठरला. विद्यालयातील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

जय महाराष्ट्र!

veer nayak

Google Ad