चांदूर रेल्वे : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात मानाचे स्थान भूषवणारे भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचे चांदूर रेल्वे येथे ता 3 रविवार रोजी आगमन झाले होते त्यांच्या उपस्थितीत शहरात तीन मजली न्यायालयाची भव्य इमारतीचे भूमिपूजन झाले असून येणाऱ्या काही काळात शहराला सर्व सोयीयुक्त न्यायालयाची इमारत मिळणार आहे, तर यावेळी शहरातील विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी १० वा त्यांच्या हस्ते शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या कोनशिला समारंभाचा कार्यक्रम पार पडला त्यांनतर ११ वाजता चांदूर रेल्वे नगरपरिषदेला ते भेट दिली यावेळी नगराध्यक्ष प्रा प्रियंका निलेश विश्वकर्मा यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला तसेच नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा भव्य शुभारंभही गवई यांच्या हस्ते करण्यात आला या सर्व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेमार्फत भव्य तयारी करण्यात आली होती तर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे शहरातील मान्यवर नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील प्रतिनिधींना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते.
यावेळी न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उच्च न्यायालय मुंबई येथील न्यायमूर्ती अनिल किलोर,न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील व निमंत्रक म्हणून स्थानिक न्यायालयाचे न्यायधीश सुजित राठोड यांचीही उपस्थिती होती
या ऐतिहासिक सोहळ्यामुळे चांदूर रेल्वे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, नागरिकांमध्ये अभिमान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.










