चांदूर रेल्वे – (ता. प्र.) चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमगाव ग्रामपंचायत समोरील वर्षानुवर्षे पडीत असलेली जागा आज पर्यावरण संवर्धनाचा आदर्श नमुना ठरत आहे. ग्रामपंचायतचे सरपंच अॅड. शिवाजी वाघ यांच्या पुढाकाराने या जागेवर तब्बल 500 फळझाडांची परसबाग फुलविण्यात आली असून, गावाच्या सौंदर्यात व पर्यावरणात नवा अध्याय लिहिला गेला आहे.
या परसबागेत पेरू, चिंच, कवठ यांसारखी दीर्घायुषी व उपयुक्त फळझाडे लावण्यात आली असून, येत्या काळात ही जागा केवळ हिरवळच नव्हे तर ग्रामस्थांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे. “विकास म्हणजे केवळ सिमेंट नाही, तर हिरवळही तितकीच गरजेची” हा संदेश या उपक्रमातून ठळकपणे पुढे आला आहे.
या उपक्रमाला रोजगारसेवक भीमचंद दुर्योधन, उपसरपंच अंकुश आठवले, सचिव निलेश आष्टीकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य संजय इंगळे, किशोर ढगे, मंगला गजभिये, नलुबाई मेश्राम, लता जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून पडीत जागेचे रूपांतर आज हरित वैभवात झाले आहे.

कळमगाव ग्रामपंचायतीचा हा उपक्रम परिसरातील इतर ग्रामपंचायतींसाठीही एक प्रेरणादायी आदर्श ठरत असून, पर्यावरण रक्षणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच भविष्यासाठी फलदायी ठरणार आहे. या परसबागेच्या देखभालीसाठी मजुरांची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.










