न्यायाची प्रतीक्षा संपत नाही; अंध कुटुंबाचा अन्यायाविरुद्ध संघर्ष 

0
11

फक्त एका घरावर कारवाई, इतरांचे घर तसेच

– निवेदन देऊनही अद्याप न्याय नाही

प्रतिनिधी

बडनेरा, (28 मे)-जुनी वस्ती मधील अलमास गेट येथील अंध दिव्यांग महेमुद अफसर खान यांचे घर व व्यवसायासाठीचे दुकान अमरावती महापालिकेने नोटीस देऊन १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाडले. मात्र याच भागातील इतर घरांवर कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे, ही नोटीस अमजद खां इस्माईल खां (नवी वस्ती)यांच्या नावाने देण्यात आली होती, पण प्रत्यक्षात घर महेमुद खान यांचे होते.

या अन्यायाविरोधात भारतीय अंधजन विकास संस्थेचे महासचिव एस. बी. नायक यांनी ५ जुलै २०२३ रोजी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले. त्यानंतर २१ सप्टेंबर २०२३ रोजी सदर प्रकरण अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आले. त्यावरही काहीच कारवाई न झाल्यामुळे ११ एप्रिल २०२५ रोजी पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले. मात्र आजतागायत महेमुद खान यांना न्याय मिळालेला नाही.

फक्त दुर्बलांवर कारवाई?

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ज्या घरांना नोटीस मिळाल्या त्या अजूनही उभ्या आहेत. मात्र अंधत्वाच्या परिस्थितीत जगणाऱ्या महेमुद खान यांच्या घरावरच कठोर कारवाई करण्यात आली, हे सुडभावना आणि भेदभावाचे धोरण असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात प्रशासनाकडून मुद्दाम दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

 

आंदोलनाचा इशारा !

या प्रकाराच्या विरोधात सामाजिक संस्थेने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर तपासणी व न्याय प्रक्रिया राबवली नाही, तर आंदोलनात्मक मार्ग स्वीकारावा लागेल. अंध व दिव्यांग व्यक्तींना रस्त्यावर उतरावे लागू नये, हीच अपेक्षा संस्थेने व्यक्त केली आहे. दिव्यांग व्यक्तींच्या घरावर अन्यायाने केलेली कारवाई, व प्रशासनाचे निष्क्रिय धोरण यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण होत आहे. याप्रकरणी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करुन संबंधित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

veer nayak

Google Ad