लाठीकाठी, कराटे, दांडपट्टा, लेझीम, फायर लाठीचे नेत्रदीपक प्रात्यक्षिक; सामुदायिक प्रार्थनेतून संस्कार व राष्ट्रभावनेचा संदेश
धामणगाव रेल्वे,
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्व प्रणालीनुसार व श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समिती दास टेकडी संलग्नित तालुका श्री गुरुदेव सेवा समिती, धामणगाव रेल्वे व स्व शकुंतलादेवी राधेश्यामजी लोया धामणगाव रेल्वे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिरा श्यामली अंतर्गत भव्य मिरवणूक उत्साहात पार पडली. संस्कार भवन, लोया वाडी येथून निघालेली ही मिरवणूक शास्त्री चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. मिरवणुकीत शेकडो विद्यार्थी, शिक्षक, सेवक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुदायिक प्रार्थना, भजने व विद्यार्थ्यांची भाषणे सादर केली. प्रार्थितो संत साधूंना शक्ती द्या बुद्धी द्या लोका या प्रार्थना गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले. यावेळी महाराष्ट्रातील प्रख्यात शिव व्याख्याते प्रा. प्रवीण देशमुख यांनी प्रार्थनेचे महत्त्व विशद करत उपस्थितांना राष्ट्रसंतांच्या कार्याची जाणीव करून दिली.


विद्यार्थ्यांनी कराटे, दांडपट्टा, लाठी-काठी, फायर लाठी व लेझीम यांची शिस्तबद्ध व आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. या सादरीकरणाने नागरिक भारावून गेले. स्वसंरक्षण व सामूहिकतेचा प्रभावी संदेश यामधून देण्यात आला. या मिरवणुकीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, देशभक्ती व व्यक्तिमत्व विकास यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शिस्तबद्ध संचलन, घोषवाक्ये व पारंपरिक वेशभूषेमुळे मिरवणूक अधिकच उठावदार ठरली.
स्थानिक श्री गुरुदेव सेवा मंडळाचा विशेष सहभाग0 लाभला असून कार्यक्रमस्थळी विद्यार्थ्यांच्या जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. आयोजक, प्रशिक्षक व सेवकांच्या परिश्रमामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. नागरिकांनीही उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.












