धामणगाव रेल्वे :- राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांना शोकाकुल वातावरणात धामणगावकरांनी श्रद्धांजली वाहिली.स्थानिक लाल बहादूर शास्त्री चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय शोक सभेत शेकडो नागरिकांची उपस्थिती श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला.


सामान्य जनतेसाठी वेळेवर धावणारा नेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात नुकतेच निधन झाले.या अपघाताची वार्ता पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या जाण्याने राज्यात शोककळा पसरली आहे. शासनाने तीन दिवस शासकीय दुखवटा घोषित केला होता दरम्यान राज्यात जागोजागी शोक संवेदना व्यक्त होत आहेत.तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी ता.३१ रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक लालबहादूर शास्त्री चौकात सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.या शोक सभेच्या अध्यक्ष स्थानी भाजपाचे आमदार प्रताप अडसड होते.आमदार म्हणून वेगळ्या पक्षाचा असलो तरी त्यांच्या आपुलकीचे अनेक प्रसंग आहेत अजितदादांनी माझ्या पाठीवर हात ठेवून जनतेच्या सेवेत काम कर म्हणून शिकवण दिली होती. वेळेची किंमत करणाऱ्या लोकप्रतिनिधिंच्या कामात गती येते त्यामुळे वेळेची किंमत करा असेच अजितदादांनी सांगितले व आज काळाने वेळ चुकवली व दादा आपल्यात नाहीत याची दुःख सर्व पक्षाच्या लोकांना व महाराष्ट्रातील जनतेला असल्याचे यावेळी आमदार प्रताप अडसड म्हणाले.जगात मृत्यू हे अटळ सत्य आहे त्यामुळे राज्याच्या विकासासाठी धावून जाणारे व प्रत्येकाच्या मनात जागा करून कर्माने मोठपण मिळवणारे अजितदादा विधिलिखित चुकवू शकले नाही त्यांचा आदर्श घेऊन चालणे व जनतेच्या सेवेत रहाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे बोलून सहकार नेते विजय उगले यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.यावेळी अजितदादांच्या प्रतिमेला पुष्प हारअर्पण करण्यात आले.दरम्यान विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करून दादांना अभिवादन केले.कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी अजितदादा यांच्या शेतकरी, सर्वसामान्य जनता व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेका व विकासकामांचा उल्लेख करण्यात आलाकार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.यावेळी आमदार प्रताप अडसड, सहकार नेते विजय उगले,जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दुर्गाबक्षीस ठाकूर,शहराध्यक्ष विनोद तलवारे,शिवसेना शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष निलेश तिवारी,आरपीआय आठवले गटाचे प्रशांत मुन,राष्ट्रवादीचे राजू अग्रवाल,शरद पवार गटाचे अध्यक्ष मंगेश ठाकरे,नगर परिषदेचे गट नेते नरेंद्र चौधरी,वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अशोक मोहोड यांच्यासह नगर परिषदेचे सर्व नगरसेवक व शहर व तालुक्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.











