प्रभाग क्रमांक ४ मधील धोकादायक डीपी त्वरित स्थलांतरित करण्याची मागणी

0
9

नांदगाव खंडेश्वर : नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये शंकर बाविस्थळे यांच्या घरासमोर असलेली वीज वितरणाची डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉइंट) अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी धोका ठरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या डीपीमुळे परिसरातील नागरिकांना सतत भीतीच्या वातावरणात राहावे लागत असून, कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डीपीच्या तारा अनेक घरांच्या छपराच्या अत्यंत जवळून गेलेल्या असून त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर परिसरातील नागरिकांना घर बांधकाम तसेच दैनंदिन कामकाज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या गंभीर विषयाकडे नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे यांनी मुख्याधिकारी, नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर यांना लेखी निवेदन दिले आहे. सदर निवेदनात डीपी तात्काळ स्थलांतरित करून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची आग्रहाची मागणी करण्यात आली आहे.
नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे यांनी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आता नगरपंचायत प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

veer nayak

Google Ad