जिल्ह्यात लोकसहभागातून शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरणाची कामे; अशासकीय संस्थांकडून अर्ज आमंत्रित

0
0

अमरावती, दि.14 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत लोकसहभागातून शेत पांदण रस्ते आणि जलपुनर्भरणाची कामे करण्यासाठी इच्छुक अशासकीय संस्थांकडून अर्ज सादर करण्याचे आवाहन आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

या योजनेमध्ये शेतकरी लोकसहभाग, ग्रामपंचायत स्वनिधी आणि जिल्हा नियोजन समिती निधी यांच्या अभिसरणातून ही कामे केली जाणार आहेत. ही योजना कोणत्याही एजन्सीच्या नफ्यासाठी नसून, ती पूर्णपणे लोकसहभाग आणि सेवाभावावर आधारित आहे, जेणेकरून कमी खर्चात शेतकरी हिताचे रस्ते निर्माण होतील.

जिल्हास्तरावरून या योजनेसाठी प्रति 1 किलोमीटर पांदण रस्त्यासाठी कमाल 9 लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये लोकसहभागाची किमान मर्यादा 1.5 लाख रुपये असून, उर्वरित रक्कम जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दिली जाईल. या निधीवर सर्व शासकीय कपाती लागू राहतील. तसेच, पांदण रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर (लोकसहभागातून होणारे मातीकाम वगळून) मोजमापानुसार जिल्हा नियोजन समितीचा निधी वितरित केला जाईल. जे अर्जदार जास्तीत जास्त लोकसहभाग आणि कमीत कमी शासकीय निधीमध्ये काम करण्यास तयार असतील, अशा संस्थांना प्राधान्य दिले जाईल. याशिवाय, यापूर्वी ‘जलयुक्त शिवार’ किंवा तलावातील गाळ काढण्याच्या योजनांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या संस्थांना विशेष प्राधान्य मिळेल.

इच्छुक अशासकीय संस्थांनी आपल्या अर्जासोबत संस्थेचे मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र, अध्यक्ष व सदस्यांची नावे, अनुभव प्रमाणपत्र आणि यापूर्वी केलेल्या कामांची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. हे अर्ज उपजिल्हाधिकारी (रोहयो) कार्यालय, अमरावती येथे सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याचा कालावधी शुक्रवार, दि. 15 मे ते 22 मे 2026 पर्यंत (सुटीचे दिवस वगळून) सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. प्राप्त अर्जांची छाननी जिल्हास्तरीय समितीमार्फत 25 मे 2026 रोजी केली जाईल. त्यानंतर छाननीमध्ये पात्र ठरलेल्या संस्थांची बैठक व चर्चासत्र 26 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या योजनेबाबत काही अडचणी किंवा अधिक माहिती हवी असल्यास उपजिल्हाधिकारी (रोहयो) ज्ञानेश्वर घ्यार (9527966064), कार्यक्रम व्यवस्थापक रामेश्वर परळकर (9890144170) यांच्याशी संपर्क साधावा.

******

veer nayak

Google Ad