नांदगाव खंडेश्वर ( तालुका प्रतिनिधी ) शहरात गॅस पाईपलाईनचे काम करणाऱ्या ‘अदानी टोटल गॅस लिमिटेड’ कंपनीच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य आणि रस्ते सुरक्षा धोक्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही कंपनीने दुर्लक्ष केल्याने, नगरसेविका सौ. प्रांजली राहूल गुल्हाने यांनी आज १८ मार्च रोजी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
नेमके प्रकरण काय?
गेल्या काही दिवसांपासून शहरात गॅस पाईपलाईनसाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. मात्र, खोदकामातून निघालेली माती आणि राडारोडा रस्त्यावरच अस्ताव्यस्त टाकून देण्यात आला आहे. यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. तसेच, रस्त्यावरील या राडारोड्यामुळे चारचाकी वाहने फसत असून अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.
नोटीस देऊनही कंपनीची टोलवाटोलवी
या गंभीर समस्येची दखल घेत नगर पंचायतीने १२ मार्च २०२६ रोजी कंपनीला अधिकृत नोटीस बजावली होती. यामध्ये पाणी फवारणी करणे, राडारोडा उचलणे आणि ग्रीन नेट लावणे अशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, कंपनीने या नोटीसीला केराची टोपली दाखवत आपले काम सुरूच ठेवले.
कायदेशीर कारवाईची मागणी
नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “कंपनीने सार्वजनिक सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवले आहेत. नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या कंपनीवर हवा प्रदूषण प्रतिबंध कायदा १९८१ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) मधील तरतुदींनुसार तातडीने गुन्हा दाखल करावा.”
या तक्रारीमुळे आता पोलीस प्रशासन आणि संबंधित कंपनी काय पावले उचलते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.














