धामणगाव रेल्वे, दि. २० जानेवारी (ता. प्रतिनिधी / वीर नायक):
श्री पंचमुखी हनुमान महाराज व सद्गुरू संत साईबाबांच्या कृपाशीर्वादाने तसेच वसंतपंचमीच्या पावन शुभमुहूर्तावर श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने सातव्या प्राणप्रतिष्ठा स्थापना दिनानिमित्त त्रिदिवसीय धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी पहाटे ६ वाजता श्री पंचमुखी हनुमान महाराज व श्री साईबाबा यांच्या मूर्तींचा अभिषेक होणार आहे. दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सपना इंगोले व संच यांच्या स्वरात श्री साईबाबा ग्रंथाचे संगीतमय पारायण होईल. सायंकाळी ७ वाजता धूपआरती संपन्न होणार आहे.
गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अखंड संगीतमय पारायण होणार आहे. शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत संगीतमय पारायणानंतर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पं. शरद पांडे यांच्या हस्ते रुद्र स्वाहाकार महायज्ञ होणार आहे.
सायंकाळी ६.३० वाजता महाआरती व भजन, तर ७.३० वाजेपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या त्रिदिवसीय उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री साई सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.










