धामणगाव रेल्वे : तालुका प्रतिनिधी
शारीरिक अडचणी कधीही यशाच्या मार्गातील अडथळा ठरत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित से. फ. ला. हायस्कूल, धामणगाव रेल्वे येथील दिव्यांग विद्यार्थी तन्मय मडावी याने.
दिनांक २९ ते ३१ डिसेंबर २०२५ रोजी जागृत विद्यालय, वरुड येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात, दिव्यांग गटातून (इयत्ता १२ वी विज्ञान शाखा) तन्मय मडावी याने “बाय वाइप सिस्टीम (Bi-Wipe System)” ही नाविन्यपूर्ण व उपयुक्त विज्ञान प्रतिकृती सादर करून प्रथम क्रमांक पटकावला असून, त्याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
बाय वाइप सिस्टीम ही वाहन सुरक्षिततेशी संबंधित एक आधुनिक व नाविन्यपूर्ण संकल्पना आहे. वाहन चालवताना समोरील काच स्पष्ट दिसणे अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र हवामानातील बदल, थंडी-उष्णतेतील फरक, पावसाळी वातावरण किंवा आर्द्रता यामुळे काचांवर दृश्य-अडथळे निर्माण होतात. यामुळे चालकाचे लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता वाढू शकते. या वास्तव समस्येचा अभ्यास करून ही संकल्पना विकसित करण्यात आली आहे.
या प्रणालीत वाहनांच्या काचेसंदर्भातील समस्या एकांगी न पाहता सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार करण्यात आला आहे. चालकाच्या सुरक्षिततेबरोबरच त्याचा आराम, विश्वास आणि वाहन चालवण्यातील सुलभता यावर भर देण्यात आला आहे. प्रत्यक्ष जीवनातील अनुभव, निरीक्षणे आणि दैनंदिन वाहनचालकांना भेडसावणाऱ्या अडचणी यांचा अभ्यास करून या संकल्पनेची मांडणी करण्यात आली आहे.
बाय वाइप सिस्टीमची रचना ही वापरकर्त्याच्या दृष्टीने सोपी, परिणामकारक आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत अशी आहे. ही प्रणाली विविध हवामान परिस्थितींमध्ये उपयुक्त ठरू शकते. विशेषतः थंड, दमट किंवा पावसाळी वातावरणात वाहन चालवताना दृश्य स्पष्ट राहावे, हा यामागील प्रमुख उद्देश आहे.
ही संकल्पना केवळ एक मॉडेल नसून भविष्यातील सुरक्षित वाहन व्यवस्थेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल मानली जात आहे. कमी खर्चात, कमी देखभालीत आणि विविध प्रकारच्या वाहनांसाठी उपयुक्त ठरू शकणारी अशी ही प्रणाली असल्याने तिचे सामाजिक व व्यावहारिक महत्त्व अधोरेखित होते.
या विद्यार्थ्याला मोलाचे मार्गदर्शन विज्ञान शिक्षक राम बावस्कर यांनी केले. या घवघवीत यशाबद्दल मुख्याध्यापक प्रशांत शेंडे, उपमुख्याध्यापक अनिल लाहोटी, पर्यवेक्षक प्रमोद हातेकर, तसेच सर्व विज्ञान शिक्षकवृंद व विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तन्मयचे अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.













