जीवनदानाचा संदेश : स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे यशस्वी रक्तदान शिबिर

0
4

धामणगाव रेल्वे | दि. १७ जानेवारी २०२६ 

समाजात सेवाभाव आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे १७ जानेवारी २०२६ रोजी रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हे शिबिर संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. शंकरप्रसादजी अग्निहोत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथील प्रादेशिक रक्तपेढी व रक्तघटक विभाजन केंद्र तसेच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, मुख्यालय नाणीजधाम, कोकण, जि. रत्नागिरी यांच्या सहकार्याने करण्यात आले.

सकाळी ९.०० वाजता शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. अविनाश उखांडे, बीडीओ, इर्विन हॉस्पिटल, अमरावती यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबिरादरम्यान सर्व वैद्यकीय नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्याची रक्तदाब व हिमोग्लोबिन तपासणी करूनच रक्तदानास परवानगी देण्यात आली. अनुभवी डॉक्टर व परिचारिकांच्या पथकामुळे रक्तदान प्रक्रिया सुरक्षित व सुलभरीत्या पार पडली. रक्तदात्यांसाठी शाळेच्या आरोग्य विभागातर्फे अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.

या प्रसंगी शिक्षकांनी पालकांसह रक्तदान करून समाजापुढे आदर्श ठेवला. सर्व रक्तदात्यांना प्रशस्तिपत्रक व डोनर कार्ड प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी म्हणाल्या, “रक्तदानाबाबत असलेले गैरसमज दूर करा. रक्तदान ही सुरक्षित व वेदनामुक्त प्रक्रिया असून त्यामुळे शरीराला नवसंजीवनी मिळते.”

पूर्व-प्राथमिक हेड शबाना खान यांनी पालकांचा सहभाग वाढविण्यात मोलाची भूमिका बजावली.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन अधिकारी श्री. प्रितेश जुनवाडे, श्री. श्रीकांत निस्ताने, गौरी वानखडे, श्री. सुमित हुनवटे,  देवयानी मंडळकर तसेच श्री प्रविण टोंगे यांनी रक्तदात्यांची नोंदणी व वैद्यकीय पथकाशी समन्वय साधत मोलाचे योगदान दिले.

या रक्तदान शिबिराच्या यशातून *स्कूल ऑफ स्कॉलर्स* परिवाराचा सेवाभावी दृष्टिकोन व सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

veer nayak

Google Ad