अमरावती, दि. १० डिसेंबर
भारतीय समाज हा आदर्शवत व जगाला मार्गदर्शन करणारा समाज असून, समाजजीवनातील पंच परिवर्तनाचे अनुकरण केल्यास जगातील विविध समस्यांचे निराकरण भारतच करू शकतो, असे मत भारतीय विचार मंचाचे विदर्भ प्रांत संयोजक सतपाल सोहळे यांनी व्यक्त केले.
जागतिक स्तरावर अनेक प्रकारचे संघर्ष, उद्देश व समस्यांचे जाळे निर्माण झाले असताना त्यातून जगाला बाहेर काढण्याची ताकद फक्त भारताकडे आहे. समाजात सद्भावना निर्माण होणे ही काळाची गरज असून मूलभूत कर्तव्यांची जाणीव ठेवून सत्याचे आचरण केले तर समाज परिवर्तन शक्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाज जीवनाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा व संवाद घडवून आणण्यासाठी आयोजित प्रमुख जनसंगोष्ठीचे आयोजन भवानी इंजिनिअरिंग वर्क्स, महाराणा प्रताप चौक, परसोडी रोड, धामणगाव रेल्वे येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून सतपाल सोहळे व विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख संजय गुळवे उपस्थित होते. व्यासपीठावर अमरावती जिल्हा संघचालक विपिन काकडे व संयोजक प्रा. अरुण मेश्राम उपस्थित होते.
यावेळी संजय गुळवे यांनी भारतीय संस्कृती, राष्ट्र संकल्पना व समाज जागृती या विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.












