धामणगाव रेल्वे : काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; आमदार प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वावर विश्वास

0
3

धामणगाव रेल्वे तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ, अनुभवी व सक्रिय कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, आमदार चैनसुख संचेती, आमदार संजय कुटे तसेच भाजपा अमरावती ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

या प्रसंगी नवप्रवेशित कार्यकर्त्यांनी प्रतापदादा अडसड यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केला. जनतेशी नाळ जुळलेले, विकासाभिमुख आणि सातत्याने कार्यरत नेतृत्व म्हणून प्रतापदादा अडसड यांच्यावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये श्री. रविभाऊ भूतळा (कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, धामणगाव रेल्वे), माजी पंचायत समिती सदस्य मंगरूळ दस्तगीर, सौ. प्रगतीताई रवींद्र भूतळा, काँग्रेस नेते दिलीपरावजी शंकरराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती शारदाताई दिलीपरावजी पाटील, माजी उपसरपंच हेमंतरावजी मोरे (देवगाव), माजी ग्रामपंचायत सदस्य उमेशरावजी दुर्गे तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते मारोतरावजी सातपुते यांचा समावेश होता.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास अमरावती जिल्हा भाजपा उपाध्यक्ष कृष्णाभाऊ मारोडकर व सुनीलभाऊ साकोरे, विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेबजी रोठे, नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड रोठे, मंडळ अध्यक्ष प्रणयभाऊ राजनकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यात राजकीय वातावरणात नवी ऊर्जा संचारली असून, आगामी काळात संघटन अधिक मजबूत होऊन जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय दिला जाईल, असा विश्वास कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केला. हा सोहळा म्हणजे एकजूट, विश्वास आणि विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

veer nayak

Google Ad