धामणगाव रेल्वे:
स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथील विद्यार्थी स्वस्तिका पोळ आणि पूर्वेश आंबटकर यांनी गुजरातमध्ये दिनांक १४ ते १७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान झालेल्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
या स्पर्धेत महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत भरघोस यश मिळवले.
मुलांच्या गटात पूर्वेश आंबटकर हा विजयी संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला,
तर मुलींच्या गटात स्वस्तिका पोळ हिने अप्रतिम खेळ करत संघाच्या विजयात मोलाची भर घातली.
दोन्ही विद्यार्थ्यांच्या चिकाटी, कठोर प्रशिक्षण आणि दमदार प्रदर्शनामुळे संपूर्ण शाळा परिवारात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सांगितले,
“स्वस्तिका आणि पूर्वेश यांनी महाराष्ट्राचा आणि स्कूल ऑफ स्कॉलर्सचा मान अभिमानाने उंचावला आहे.”
या यशामागे क्रीडा शिक्षक नितीन जाधव आणि प्रतीक्षा उईके यांचे सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि मार्गदर्शन महत्वाचे ठरले. प्रशासकीय अधिकारी श्री. प्रितेश जणवाडे, शिक्षकवर्ग आणि सर्व कर्मचारीवर्गाने या दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
महाराष्ट्राच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्य, संयम आणि संघभावना प्रदर्शित करत अखेर राष्ट्रीय विजेतेपदावर आपला ठसा उमटवला.












