इंधन बचत ही केवळ आर्थिक गरज नसून पर्यावरण आणि पुढील पिढीसाठीची जबाबदारी – तुळसीदास टांगले

0
10

चांदूर रेल्वे आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन

चांदूर रेल्वे :

“आज इंधनाची बचत करणे म्हणजे उद्याच्या सुरक्षित भविष्याची गुंतवणूक आहे. छोट्या सवयींमधून मोठे बदल घडवता येतात. चालक, वाहक आणि तांत्रिक कर्मचारी यांनी इंधन बचतीला जीवनशैलीचा भाग बनवावा,” असे प्रतिपादन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदूर रेल्वे येथील शिल्पनिदेशक तुळसीदास (प्रशांत) टांगले यांनी केले. चांदूर रेल्वे आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रम सन 2026 च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

चांदूर रेल्वे आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उद्घाटन तुळसीदास टांगले यांच्या हस्ते पार पडले. सदर कार्यक्रमाचा कालावधी 26 जानेवारी 2026 ते 15 फेब्रुवारी 2026 असा आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रादेशिक व्यवस्थापक (अमरावती) रोहन पलंगे हे उपस्थित होते.

श्री. टांगले यांनी आपल्या भाषणात इंधनाचा योग्य वापर, वाहनांचे नियमित देखभाल व्यवस्थापन, शिस्तबद्ध वाहनचालना आणि कर्मचाऱ्यांची जागरूकता यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन बचत साध्य होऊ शकते, असे स्पष्ट केले. इंधन बचतीमुळे आर्थिक लाभासोबतच प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे यांनीही कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना इंधन बचत ही काळाची गरज असून भविष्यात याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असे सांगितले.

या कार्यक्रमावेळी आगार व्यवस्थापक जयंत झाडे, विभागीय अधिकारी श्री. गव्हाळे, मांजरे मॅडम, डोळस मॅडम उपस्थित होत्या. तसेच चांदूर रेल्वे आगारातील चालक, वाहक व यांत्रिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश ठाकरे, प्रवीण घाटे, विजेंद्र बनसोड, नरेंद्र दांडेकर, राजू बांते यांनी विशेष परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad