नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर येथील आनंद दिलीप जयसवाल (वय २१) हा युवक बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता आनंद हा आयटीआयला जाण्यासाठी घराबाहेर पडला; मात्र सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढत गेली.
कुटुंबीयांनी तातडीने मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेची गंभीरता ओळखून पोलिसांनी त्वरित शोधमोहीम हाती घेतली. आनंदचा रंग गोरा असून त्याने आकाशी रंगाची टी-शर्ट व काळी पॅन्ट परिधान केली होती. तसेच तो लाल रंगाच्या दुचाकीवर (क्रमांक MH-30-1442) घरातून निघाला होता, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली होती.


तपासादरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत अखेर दस्तूर नगर येथील गोडबाबा मंदिर परिसरातून आनंद याला सुखरूप शोधून काढले. मंगरूळ चव्हाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आत्राम, गोपनीय अंमलदार सदाशिव देवकत्ते, पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत गावंडे व रविराज राठोड यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.
अचानक बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध लागल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असून पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच गावकरी, मित्रपरिवार आणि समाजबांधवांनीही पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कामगिरीचे कौतुक केले.
ही घटना पोलिसांच्या सतर्कता, जबाबदारी आणि तत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून, संकटकाळात प्रशासनावर ठेवलेला विश्वास अधिक दृढ करणारी आहे.












