दिव्यांगांना तालुकास्तरावरच मिळणार दिव्यांग प्रमाणपत्र

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील दिव्यांगांच्या सोयीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता दिव्यांगांना प्रमाणपत्रासाठी जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही. ही सुविधा लवकरच तालुकास्तरावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

उपजिल्हा रुग्णालय अचलपूर, धारणी, मोर्शी, दर्यापूर आणि ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार, तिवसा येथे कायमस्वरूपी दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव ‘आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे’ यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच संबंधित केंद्रांना ‘युडीआयडी’ पोर्टलचे लॉगिन आयडी व पासवर्ड दिले जातील. त्यानंतर तालुकास्तरावरच प्रमाणपत्र वाटप सुरू होईल.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत सन २०२२ ते २०२५ या कालावधीत आयोजित शिबिरांद्वारे एकूण २ हजार ४७३ दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील दिव्यांगांना अमरावती शहरात येण्या-जाण्याचा होणारा त्रास आणि खर्च वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिव्यांग प्रमाणपत्र, आजाराचे प्रमाणपत्र किंवा वृद्धांच्या वयाचा दाखला देण्यासाठी शासन स्तरावरून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ही प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही दलालांच्या आमिषाला बळी पडू नये. कोणी पैशांची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती यांच्याकडे तक्रार करावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी कळविले आहे.

veer nayak

Google Ad