धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ने दणदणीत यश मिळवत नगरपरिषदेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. आज जाहीर झालेल्या निकालात भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले असून शहराच्या राजकारणात मोठा बदल घडून आला आहे.
नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार सौ. अर्चना रोठे अडसड यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत १४३८ मतांच्या निर्णायक आघाडीने विजय संपादन केला. त्यांच्या विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
विशेष बाब म्हणजे, नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे २० पैकी २० उमेदवार विजयी झाले असून नगरपरिषदेवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. निकाल जाहीर होताच शहरात फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष, मिरवणुका आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.
या निकालातून धामणगाव रेल्वे शहरातील मतदारांनी विकास, स्थिर प्रशासन आणि मजबूत नेतृत्वाला कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस निर्णय, पारदर्शक प्रशासन आणि प्रभावी कामकाजाची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.











