नांदगाव खंडेश्वर येथील Shivaji High School मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप)परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप पालक व विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबत सर्व संबंधित विद्यार्थी व पालकांनी संयुक्त अर्ज सादर केला असून, त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, शिवाजी हायस्कूलमधील काही विद्यार्थ्यांना परीक्षेतील प्रश्नपत्रिका सांगण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच इतर शाळांतील विद्यार्थ्यांना गैरवर्तनाची वागणूक देण्यात आली, त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक हक्कांवर अन्याय झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.
“शिष्यवृत्ती( स्कॉलरशिप )परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित असते. अशा परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणे अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे.
या वेळी उपस्थित पालकांमध्ये नगरसेवक अविनाश ब्राम्हणवाडे लौकेश उडबगले, अभय भोयर, उमेश चौकडे,मनोज जागंडा, नमित जैन, कैलास गजबे, श्यामसिंग परिहार, रणजित खंडारकर, कान्तेश्वर पुंड, अवधूत जेवडे, श्रावणी सोळंके आदींचा समावेश होता.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली असून, शिक्षण विभागाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.













