घुईखेड ग्रामपंचायतीत प्रजासत्ताक दिनी प्रतिष्ठित नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा नागरी सत्कार. सर्वप्रथम ग्रामपंचायत कर भरणाऱ्याचा ही सत्कार

veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामपंचायत घुईखेड येथे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त राज्य राखीव पोलीस दलातील जवान व हौशी खगोलशास्त्र अभ्यासक विजय गिरूळकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक भानुदास बनकर, लक्ष्मण पवार, दिपक जयस्वाल, विद्याताई उदयकर (माजी पं.स. सभापती) तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यासीन खान यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यांशिवाय गावातील उच्च शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केलेले विद्यार्थी अभिषेक अरविंद चनेकार (अभियांत्रिकी पदव्युत्तर व संशोधन पदवी, भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई) आणि डॉ. अंकित गोविंद नवघरे (औषधशास्त्र विषयातील वैद्यकीय पदवी) यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याचप्रसंगी ग्रामपंचायत कर वेळेवर भरून ग्रामपंचायतीच्या विकासकामात हातभार लावणारे नागरिक निलकंठ मानकर यांचा सरपंच वर्षलता हेमंत जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरपंच वर्षलता हेमंत जाधव यांनी मागील पाच वर्षांत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. उपसरपंच अनिल वानखडे यांनी बेंबळा पुनर्वसन योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना शिलनकर (ग्रामपंचायत सदस्य) यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल गडलिंग (ग्रामविकास अधिकारी) यांनी केले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सचिन गुल्हाने, आशीष दाणी, लहानु मेश्राम, विवेक काकडे, संगीता गिरूळकर, पूजा पवार, जयश्री इंगोले, शारदा कुकडकार, ग्रामपंचायत कर्मचारी अजय तवर, प्रभाकर जुनघरे, घनश्याम नंदरधने, महेंद्र काकडे, श्रीकांत खोब्रागडे, रोजगार सेवक किशोर क्षिरसागर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगट समन्वयक, वाचनालयाचे विद्यार्थी तसेच गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक राजू गायकवाड

Google Ad