चांदूर रेल्वे येथील राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय यांच्या वतीने उन्नत भारत अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ग्रामसभा व ग्रामपंचायत अभ्यास भेट आयोजित करण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन संयोजक डॉ. पी. आर. सरदार व डॉ. एस. एस. पाधेन यांनी केले होते. या अभ्यासभेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना ग्रामीण प्रशासनाची कार्यपद्धती, ग्रामपंचायतीचे कार्य व विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष माहिती देणे हा होता.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्थांना वृक्षरोपांचे वाटप करून करण्यात आली. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला तसेच ग्रामस्थांमध्ये हरित पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात आली.
या वेळी सरपंच श्री. धनंजय गवांडे, उपसरपंच जळीतकर मॅडम, ग्रामसेविका सोनवणे मॅडम, सदस्या भोंड मॅडम, श्री. सुरेश गोरकर तसेच ग्रामपंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सरपंच व ग्रामसेविकांनी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीची कार्यपद्धती, ग्रामसभेचे महत्त्व, ग्रामविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना यांची सविस्तर माहिती दिली. या चर्चासत्रातून विद्यार्थ्यांना ग्रामीण विकास व स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व समजण्यास मदत झाली.
या अभ्यासभेटीत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला व ग्रामपंचायतीच्या कामकाजाविषयी प्रश्न विचारून माहिती घेतली. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होऊन ग्रामीण विकास प्रक्रियेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.













