अमरावती, दि. 8 (जिमाका): जिल्ह्यातील शेत पांदण रस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी पाच कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. लोकसहभागातून हे रस्ते होणार असून याकामासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना शेतीमध्ये जाण्यासाठीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. यासाठी लोकसहभागातून पांदण रस्ते बांधण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनच्या निधीमधून 5 कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार आहे. ही योजना लोकसहभाग आणि शासकीय निधीच्या संयुक्त विद्यमाने राबविली जाणार आहे. योजनेसाठी प्रति किलोमीटर 9 लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. यातील 7.5 लाख रुपयांचा निधी शासन देणार असून उर्वरित 1.5 लाख रुपये लोकसहभागातून द्यावे लागणार आहेत.
या योजनेचा पथदर्शी प्रकल्प अंजनगाव सुजी तालुक्यात राबविण्यात येणार आहे. या तालुक्यात 20 किलोमीटर, तर इतर सहा तालुक्यात प्रत्येकी पाच किलोमीटरप्रमाणे 30 किलोमीटरचे पांदण रस्ते बांधण्यात येणार आहे. या कामासाठी लोकजागर या संस्थेची निवड करण्यात आली आहे. योजनेमुळे शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर होऊन शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत नेणे अधिक सुलभ होणार आहे.
शेतरस्ते मोकळे करणे आणि जल पुनर्भरणासाठी हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात बारामाही शेत रस्ते तयार करण्यात येणार आहे. पाणंद रस्त्यांसाठी पाच किलोमीटरच्या आतील नदी व नाल्यांमधील गाळ व साहित्याचा वापर केला जाणार आहे. हे साहित्य स्वयंसेवी संस्थांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे जलस्त्रोतांचे खोलीकरण होऊन पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.














