आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : शिकारीचा पाठलाग करत असताना बिबट्या विहिरीत पडल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना टाकरखेडा शिवारातील संजय देशमुख यांच्या शेतामध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, आता याही शिवारात बिबट्याचा वावर असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
टाकरखेडा येथील संजय देशमुख यांच्या शेतात विहीर असून, शुक्रवारी सायंकाळी एक मजूर विहिरीजवळ गेला असता त्याला विहिरीत बिबट्या मृतावस्थेत दिसला. त्यांनी लागलीच माहिती शेतमालक संजय देशमुख यांना दिली. त्यांनी शेतात जाऊन पाहणी केली तसेच वनविभागाला कळविले. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवराले यांच्यासह पथक सायंकाळी साडेसहा वाजता घटनास्थळी पोहोचले. तपासणीअंती दोन दिवसांपूर्वी शिकारीचा पाठलाग करीत असताना दोघेही विहिरीत पडून गतप्राण झाल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. बिबट्यासोबत डुकराचे पिल्लूही विहिरीत मृतावस्थेत आढळल्याचे सांगितले.
शिकारीचा पाठलाग करताना बिबट्याचा मृत्यू झाला असावा. कारण विहिरीत बिबट आणि डुकराचे पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी सोबत असून, बिबट आणि डुकराच्या पिलाला बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. दोघांचेही शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यात आला.
सुरेश गवराले वनपरिक्षेत्र अधिकारी, आर्वी.












