धामणगांव रेल्वे, दि. 26 डिसेंबर 2025 : डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जयंती महोत्सव–2025 (१९वे वर्ष) निमित्त श्री छत्रपती हायस्कूल, धामणगांव रेल्वे येथे आयोजित आंतरशालेय वक्तृत्व (वाद–विवाद) स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगांव रेल्वे येथील इयत्ता दहावी ‘अ’ मधील विद्यार्थिनी आस्था रामकुमार इंगोले हिने द्वितीय क्रमांक पटकावून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेचा विषय “डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख : जीवन व कार्य” असा होता. आस्थाने आपल्या प्रभावी वक्तृत्वशैलीतून विषयाची सखोल मांडणी, स्पष्ट विचारसरणी व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करून परीक्षक मंडळाचे विशेष लक्ष वेधून घेतले. तिच्या प्रभावी अभिव्यक्तीचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

या स्पर्धेत स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग उल्लेखनीय ठरला. आस्थाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी, प्रशासन प्रमुख प्रितेश जनवाडे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत तिला व तिच्या पालकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विद्यालय परिवाराने मत व्यक्त केले की, अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, आत्मविश्वास वाढतो तसेच विचार मांडण्याची व अभिव्यक्तीची क्षमता अधिक सशक्त होते.
आस्था रामकुमार इंगोले हिच्या या यशामुळे स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगांव रेल्वे येथे आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.












