अमरावती, दि. 19 (जिमाका): राज्यातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना’ सुरू केली आहे. या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश शेत शिवारातील अतिक्रमित झालेले पाणंद रस्ते मोकळे करणे आणि तेथे दर्जेदार, बारमाही दळणवळणास योग्य रस्ते तयार करणे हा आहे. ग्रामीण भागातील या पायाभूत सुविधेमुळे शेतकऱ्यांना पीक कापणी, मशागत आणि शेतमाल बाजारपेठेत नेणे सोपे होणार आहे. ही कामे पूर्णपणे यंत्रसामग्रीच्या सहाय्याने केली जाणार असून, कामात पारदर्शकता आणि गुणवत्ता राखण्यासाठी इच्छुक मशीनधारक व कंत्राटदारांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत.
या योजनेची कार्यपद्धती आणि निविदा प्रक्रिया कंत्राटदारांना नीट समजावी, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे बुधवार, दि. 24 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता अमरावती येथील कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांच्या कार्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत मशिनधारकांशी सविस्तर चर्चा करून खोदकाम, माती, मुरुम वाहतूक आणि रोड रोलरने दबाई करणे यासाठीचा ‘प्रति तास दर’ निश्चित केला जाणार आहे.
बैठकीनंतर जिल्हास्तरावर विधानसभा क्षेत्रनिहाय यंत्रधारकांचे एक पॅनेल तयार करण्यात येईल, जे प्रत्यक्ष रस्त्यांच्या कामासाठी जबाबदार असेल. जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत व इच्छुक मशिनधारकांनी आणि कंत्राटदारांनी या चर्चासत्राला उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी ( रोहयो) यांनी केले आहे.















