धामणगाव रेल्वे : तालुक्यातील कासारखेड येथे धामणगाव एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत विशेष श्रम संस्कार शिबिराच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी ‘द आर्टिस्ट म्युझिक कराओके क्लब’च्या वतीने संगीत मेजवानीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात थोर पुरुषांना वंदन करून करण्यात आली. यावेळी ‘द आर्टिस्ट म्युझिक कराओके क्लब’चे मुख्य संचालक प्रा. सतीश राऊत व प्रा. सचिन घारफळकर यांनी प्रेरणादायी व दर्जेदार गीतांच्या सादरीकरणातून वातावरण संगीतमय केले. तसेच सागर ठाकरे, प्रफुल्ल महल्ले, मोहनहरी रगडे व निवृत्ती कुंभारे यांनी आपल्या सुरेल गायनाने रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमादरम्यान गायक सागर ठाकरे यांनी युवकांनी संगीताची जोपासना करत समाजोपयोगी कार्यासाठी त्याचा सकारात्मक वापर कसा करता येईल, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी एनएसएस कॅम्पचे अधिकारी डॉ प्रवीण केचे यांच्या हस्ते ‘द आर्टिस्ट म्युझिक क्लब’च्या सर्व कलाकार सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या विशेष श्रम संस्कार शिबिराचे मार्गदर्शन प्रा. डॉ. प्रवीण केचे, प्रा. डॉ. पूनम गहुकर, प्रा. डॉ. फुरकान पठाण व प्रा. विशाल मोकाशे यांनी केले. शिबिराच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी श्रमदान, स्वच्छता, सामाजिक प्रबोधन व सांस्कृतिक उपक्रम राबवून आदर्श कार्य साकारले. या संगीत कार्यक्रमाचा गावातील शेकडो संगीत रसिकांनी मनःपूर्वक आस्वाद घेतला. एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नियोजन व शिस्तबद्ध व्यवस्थापन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. संगीत, सेवा आणि संस्कार यांचा सुरेख संगम साधणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.










