वीज कंपनीने सहनशीलतेचा अंत पाहू नये
१५ दिवसात कार्यालय धामणगावात सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा
विजेच्या तक्रारी घेवून ग्राहकांना करावी लागते पायपीट
कार्यालयाच्या स्थानांतरणामुळे वीज ग्राहकांना फटका
धामणगाव रेल्वे :- वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता,सहाय्यक अभियंता कार्यालय शहराबाहेर ५ कि.मी. अंतरावर नारगावंडी येथे
हलविले आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे व मनस्ताप करावा लागत आहे.विजेच्या तक्रारी घेवून येणाऱ्या ग्राहकांना पायपीट करावी लागत आहे.त्यामुळे हे कार्यालय शहरात पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी
हिंगणगावचे ग्रामपंचायतीचे प्रशासक दुर्गाबक्षसिंह ठाकुर यांनी केली आहे.दरम्यान १५ दिवसात कार्यालय धामणगावात सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वीज ग्राहकांच्या तक्रारी निवारण व सुविधांसाठी शहरातील अमर शहीद भगतसिंग चौकाजवळ असलेले शहर शाखेच्या सहाय्यक अभियंत्यांचे कार्यालय तसेच तालुक्यातील वीज वितरणाचा कारभार चालविणाऱ्या उपकार्यकारी अभियंता यांचे कार्यालय शहराबाहेरील यवतमाळ रस्त्यावर नारगावंडी येथील ३३ के.व्ही.पॉवर मध्ये हलविले आहे. शहरापासून ५ कि.मी. दूर अंतरावर हे कार्यालय हलविल्यामुळे विजेच्या संदर्भात बिलांची दुरुस्ती,नवीन विद्युत जोडणी, विजेच्या तक्रारी घेवून येणाऱ्या ग्राहकांना पायपीट करावी लागत आहे. विशेषत: महिला व वृद्ध ग्राहकांची गैरसोय होत आहे. वेळी-अवेळी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.वीज ग्राहकांना पायपीट करावी लागणार नाही यासाठी प्रशासनाने येथे लक्ष देण्याची गरज आहे. वीज ग्राहकांच्या सेवेकरिता कार्यालय आहेत. त्यांच्या त्रासाकरिता नाहीत याचा विसर प्रशासनाला पडल्याचे दिसत असल्याचा आरोप ग्राहक करीत आहे.कार्यालय वीज केंद्रात हलविण्यात आलेले शहरातील सहाय्यक अभियंत्याचे कार्यालय तातडीने शहरात स्थलांतरित करावे,अशी मागणी वीज ग्राहकांची आहे.
——–
धामणगांव रेल्वे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता कार्यालय व अर्बन धामणगांव शहर कार्यालय धामणगांव वरून पाच किलोमीटर अंतरावर नारगावंडी येथे नेल्यामुळे विद्युत वितरण कंपनी बाबत काही तक्रारी असल्यास विद्युत ग्राहकांना पाच किलोमीटर नारगावंडी येथे जावे लागते.त्यामुळे ग्राहकांना अतोनात प्रमाणात त्रास होत आहे.याबाबत वारंवार धामणगाव रेल्वे येथे विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय सुरू करण्यात यावे,याचा पाठपुरावा सुरू आहे.वीज कंपनीने सहनशीलतेचा अंत पाहू नये.त्यामुळे विद्युत ग्राहकांचा दिवसें दिवस रोष वाढत आहे. संबंधीत दोन्ही कार्यालय धामणगांव रेल्वे येथे पूर्ववत सुरू करण्यात यावे. पंधरा दिवसाच्या आत संबंधीत विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय धामणगांवला सुरू न केल्यास नाईलाजास्तव उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
दुर्गाबक्षसिंह ठाकूर, प्रशासक ग्रामपंपचात हिंगणगाव
——–













