धामणगाव रेल्वे येथे बहुप्रतीक्षित रंगरंगीला फाल्गुन मेळा खाटू नरेश श्रीश्यामबाबांचा प्रगटोत्सव २५ फेब्रुवारीपासून पाच दिवसीय धार्मिक अनुष्ठान व भजन संध्या .श्री बालाजी-खाटूश्याम सेवा समितीचे अकरावे वर्ष .२७ फेब्रुवारी रोजी भव्य निशाण यात्रा

0
33

धामणगाव रेल्वे :
कोट्यवधी भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या राजस्थानातील खाटू धाम येथील कलियुगातील अवतारी श्रीश्यामबाबांच्या प्रगटोत्सवानिमित्त धामणगाव रेल्वे येथे पाच दिवसीय रंगरंगीला फाल्गुन मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २५ फेब्रुवारी ते रविवार, १ मार्च दरम्यान हा भव्य मेळा हजारो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. धार्मिक अनुष्ठानांसोबतच विविध झुले, खाद्यपदार्थांचे स्टॉल व अम्युझमेंट पार्कची आकर्षणेही मेळ्यात असणार आहेत.
स्थानिक से. फ. ला. हायस्कूलसमोरील जे. बी. पार्क येथील श्री बालाजी-खाटूश्याम मंदिरात मागील दहा वर्षांपासून फाल्गुन शुक्ल एकादशी निमित्त हा मेळा भरविण्यात येतो. फाल्गुन शुक्ल नवमी ते तेरस दरम्यान पाच दिवस दररोज श्रीश्यामबाबांच्या मूर्तीचे आकर्षक फुलांनी अलंकरण करण्यात येते. सायंकाळी ६ वाजता दिव्य ज्योत प्रज्वलित करून भजन संध्येला सुरुवात होते. देशभरातील ख्यातनाम श्यामभक्त गायक आपल्या सुमधुर भजनांनी वातावरण भक्तिमय करतात. दररोज भाविकांसाठी प्रसादरूपी भंडाऱ्याची व्यवस्था करण्यात येते.
या वर्षी भजन संध्या मध्ये २५ फेब्रुवारी नागपूर येथील मनीष बेरीसाल यांची “श्रीश्याम देंगे सहारा” प्रस्तुती करतील, २६ फेब्रुवारी इंदौर (म.प्र.) येथील शुभम राणा यांची “श्याम हमारा प्यारा” भजनरचना होणार, २७ फेब्रुवारी बालाघाट (म.प्र.) येथील सुप्रसिद्ध गायिका सोनाली नागेश्वर यांची “श्याम तेरे कितने नाम” भजन संध्या सादर करतील,
२८ फेब्रुवारी बहराइच (उ.प्र.) येथील माही पोरवाल यांची “श्याम का दरबार निराला” प्रस्तुती देणार,१ मार्च जयपूर (राजस्थान) येथील प्रिती लड्ढा यांची “फागुन का रसिया श्याम” या भजनमालेने समारोप होईल.

२७ फेब्रुवारी रोजी भव्य निशाण यात्रा

शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक जे. बी. जिन येथून लाकडी हस्तचालित रथावर विराजमान श्रीश्यामबाबांच्या विग्रहाची भव्य निशाण यात्रा काढण्यात येणार आहे. ही यात्रा नगरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत जे. बी. पार्क येथील मंदिरात पोहोचेल. पारंपरिक राजस्थानी वेशभूषेत महिला व पुरुष हातात ध्वज (निशाण) घेऊन सहभागी होतील. गाजे-बाजे, भजन दिंडी आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही यात्रा पार पडेल.
एकादशीच्या दिवशी दिवसभर मंदिराचे पट दर्शनासाठी खुले राहतील. हिंगणघाट, वर्धा, आर्वी, पुलगाव, देवळी, अमरावती, यवतमाळ, चांदूर रेल्वे तसेच तळेगाव दशासर येथून अनेक भाविक उपस्थित राहतात. काही भक्त पायी निशाण घेऊन डीजेच्या तालावर नृत्य करत आगमन करतात. याच दिवशी श्रीश्यामबाबांना छप्पन भोग अर्पण करून रात्री १० वाजता महाआरती होईल.
या भव्य रंगरंगीला फाल्गुन मेळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असून जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून भक्तीमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री बालाजी-खाटूश्याम सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad