जागरूक पालक, सुरक्षित बालक” विषयावर पालक प्रबोधन कार्यशाळा 

0
6

धामणगाव रेल्वे :

स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे दि. 18 डिसेंबर 2025 रोजी “जागरूक पालक, सुरक्षित बालक” या विषयावर पालकांसाठी विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. बदलत्या सामाजिक वातावरणात मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांची भूमिका व कायदेशीर संरक्षणाचे महत्त्व या विषयावर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेच्या प्रमुख वक्त्या ॲड. सौ. दिपाली येळणे (दिवाणी व फौजदारी न्यायालय, धामणगाव रेल्वे) होत्या. त्यांनी पालकांना संबोधित करताना बालहक्क, POCSO कायदा, इंटरनेटचा असुरक्षित वापर, तसेच पालकांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर माहिती दिली.

“मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांचे जागरूक असणे हीच पहिली पायरी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद ठेवावा, जेणेकरून कोणतीही समस्या वेळेत लक्षात येईल, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी पालकांसाठी प्रश्नोत्तर सत्र घेण्यात आले. या सत्रात पालकांनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत आणि कायदेशीर बाबींविषयी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

शाळेच्या प्राचार्या मा. प्रचिती धर्माधिकारी यांनी पालकांना मार्गदर्शन करताना शाळा व पालक यांच्यातील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “प्रत्येक मुलाला सुरक्षित व आत्मविश्वासपूर्ण वातावरण देणे हे आमचे प्राधान्य आहे. सुरक्षिततेशिवाय शिक्षण अपूर्ण आहे,” असे त्या म्हणाल्या.

शाळेच्या प्री-प्रायमरी विभागाच्या प्रमुख शबाना खान यांनी लहान मुलांच्या संवेदनशीलतेविषयी मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांचे बोलणे कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकून घ्यावे, तसेच मुलांना निर्भयपणे आपली अडचण मांडता येईल असे वातावरण निर्माण करावे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे समारोप पूजा शेळके यांनी केला. त्यांनी मार्गदर्शनासाठी उपस्थित मान्यवर वक्त्या तसेच सर्व पालकांचे आभार मानले.

veer nayak

Google Ad