प्रतिनिधी
अमरावती : शहरातील मध्यवर्ती असलेल्या जयस्तंभ चौक येथे पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे अवघ्या एक किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल एक तासाहून अधिक वेळ लागत असल्याने वाहनधारक अक्षरशः हैराण झाले आहेत.
दिवसभरात वाढलेली वाहतूक, अपुरी पोलिस बंदोबस्त व्यवस्था आणि सिग्नल व्यवस्थेतील त्रुटी यामुळे चौकात सतत कोंडी होत असल्याचे चित्र आहे. शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळेत तसेच कार्यालयीन वेळेत व सायंकाळच्या सुमारास परिस्थिती अधिकच बिकट होत असून रुग्णवाहिका देखील या कोंडीत अडकत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.

या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी वाहनधारक व खाजगी चालकांनी केली आहे










