चांदूर रेल्वे – (ता. प्र.)
चांदूर रेल्वे शहरात 11 वी व 12 वीच्या उर्दू माध्यमातील महाविद्यालयीन शिक्षणाची तातडीने सुरूवात करावी, अशी मागणी स्थानिक मुस्लिम समाजातर्फे काही महिन्यांपूर्वीच आमदार प्रताप अडसड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने या मागणीला पुन्हा उफाळा आला आहे. आज सोमवापपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून, या अधिवेशनात चांदूर रेल्वेतील उर्दू महाविद्यालयाचा मुद्दा मांडला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे, विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी शासन धोरणे घोषित करत असते. परंतु चांदूर रेल्वे तालुक्यातील उर्दू माध्यमातील विद्यार्थी आजही महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे वास्तव बदललेले नाही. शहरातील जवळपास दोन हजारांहून अधिक मुस्लिम लोकसंख्येचा प्रश्न हा फक्त निवडणुकीतील चर्चेपुरता न राहता प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्थेवर परिणाम करणारा झाला आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून चालवली जाणारी मौलाना अबुल कलाम आझाद उर्दू पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा दहावीपर्यंतच मर्यादित असून, अकरावी-बारावीचा पर्याय उपलब्ध नाही. यामुळे अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे बाहेरील शहरांमध्ये शिक्षणासाठी जाऊ शकत नाहीत. धामणगाव मतदारसंघातील तीनही तालुक्यात उर्दू माध्यमातील सायन्स महाविद्यालय नसल्याने, चांदूर रेल्वेत असे महाविद्यालय झाल्यास तिन्ही तालुक्यांना दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात पूर्वी नगरपरिषदेमध्ये ठरावही झाला होता; मात्र अंमलबजावणीचा सवाल अद्याप धूसर आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत या प्रश्नावर वेगवेगळ्या पक्षांनी आश्वासने दिली. विधानपरिषद सदस्य संजय खोडके यांनीही उर्दू महाविद्यालय लवकरच सुरू होईल असा शब्द दिला होता.
मात्र आश्वासनांचे डोंगर, कृती शून्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली असून, या हिवाळी अधिवेशनात कोणता लोकप्रतिनिधी हा मुद्दा ठामपणे मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











