यवतमाळ लोकनायक वृत्तसेवा : यवतमाळ येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पोस्टमार्टम (शवविच्छेदन) प्रक्रियेदरम्यान मृतकांच्या नातेवाईकांकडून अवैधरित्या पैशांची मागणी व वसुली होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.मृत्यूमुळे आधीच दुःखात असलेल्या कुटुंबीयांना अशा प्रकारे मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास ढासळवणारा आहे. “रुग्णालय हळूहळू श्मशानालयात रूपांतरित होत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
या प्रकरणी रुग्ण हक्क संरक्षण समितीने संबंधित श्री व ना शासकीय महाविद्यालय व रुग्णालय चे मुख्य अधिष्ठाता यांना अधिकृत तक्रार दाखल केली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ व कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हक्क सुरक्षित राहावेत, तसेच कोणत्याही प्रकारचे आर्थिक शोषण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचे रुग्ण हक्क संरक्षण समिती यवतमाळ चे पदाधिकारी तर्फे व्यक्त करण्यात आले या वेळी महिला विदर्भ अध्यक्ष मनीषा तिरणकर, मोबीन शेख, अविनाश धनेवार, सुर्जित सिंह राठोड, सलीम शेख,आकाश चमेडीया जिजा तलवारे, उषा श्रीराम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.














