धामणगाव रेल्वे : श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशीला साजरा होणारा हा पवित्र उत्सव यावर्षी ३१ मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसह साजरा करण्यात आला.

भगवान महावीर हे जैन धर्मातील २४ वे आणि शेवटचे तीर्थंकर मानले जातात. त्यांचा जन्म कुंडग्राम (कौंडिण्यपुर) येथे झाला होता. त्यांचे वडील सिद्धार्थ हे स्थानिक प्रमुख होते, तर माता त्रिशला या राजघराण्यातील होत्या. लहानपणापासूनच चिंतनशील व वैराग्यशील स्वभाव असलेल्या महावीरांनी वयाच्या तिसाव्या वर्षी गृहत्याग करून आत्मज्ञानाच्या मार्गाचा अवलंब केला. त्यामुळे त्यांचा जन्मदिवस जैन समाजासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो.महावीर जयंतीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा स्थानिक गांधी चौक येथील श्वेतांबर जैन मंदिरातून प्रारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत महावीर भवन येथे समारोप झाला. काही ठिकाणी दिगंबर जैन मंदिरातूनही शोभायात्रेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती मिळाली.
या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे आकर्षक पद्धतीने सजवलेला रथ आणि त्यावर विराजमान असलेली भगवान महावीरांची प्रतिमा होती. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या जैन बांधव व महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. ‘जियो और जीने दो’ तसेच ‘अहिंसा परमो धर्म’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.शहरातील विविध ठिकाणी या शोभायात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. युवकांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्सवाचा आनंद लुटला. एकूणच, महावीर जन्मकल्याणक निमित्त धामणगाव शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.












