धामणगाव रेल्वे | दि. २८ डिसेंबर २०२५ :
दिल्ली येथे आयोजित १३व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथील विद्यार्थी कृष्णा सचिन चौधरी व रोहन राजेश खोब्रागडे यांनी दमदार कामगिरी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.
या प्रतिष्ठित स्पर्धेत देश-विदेशातील नामांकित कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. कुमिते प्रकारात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कृष्णा सचिन चौधरी याने रौप्यपदक, तर रोहन राजेश खोब्रागडे याने सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेत मानाचा शिरपेच रोवला गेला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा परिसरात विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कराटे प्रशिक्षक सचिन मुन यांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच क्रीडा शिक्षक नितीन जाधव, प्रतीक्षा उईके व विद्यार्थ्यांचे पालक यांचाही सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी प्रितेश जुनवडे, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळा प्रशासनाने सांगितले की, विद्यार्थ्यांची मेहनत, शिस्त, सातत्यपूर्ण सराव व योग्य मार्गदर्शन यांचे हे यशस्वी फलित असून, ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.












