चांदूर रेल्वे :- विठ्ठल… विठ्ठल… गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर आणि भक्तीभावाने ओथंबलेल्या वातावरणात पंढरपूरची आषाढी वारी जणू घुईखेड येथे अवतरली होती. वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयातून साकारलेल्या आषाढी वारी दर्शनाने उपस्थितांची मने जिंकली आणि डोळ्यांचे पारणे फेडले.
श्रीमती कमलाबाई टावरी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नागपूर द्वारा संचालित चांदूर रेल्वे तालुक्यातील श्रीमती कमलाबाई ब. टावरी इंग्लिश स्कूल, घुईखेड येथे संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. डॉ. बद्रीदास रामचंद्रजी टावरी (बाबूजी) यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम दुपारच्या सत्रात माध्यमिक विभागासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. वीरेंद्र जगताप (माजी आमदार) होते. प्रमुख अतिथी म्हणून घोडे अकॅडमी, चांदूर रेल्वेचे संचालक अंकुश घोडे, तसेच संस्थेचे संचालक कृष्णकुमार टावरी, उपाध्यक्ष प्रेमकुमार टावरी, संस्थेच्या सदस्या शारदा टावरी, स्नेह टावरी, शाळा प्रमुख रूपेश भोयर आणि उपमुख्याध्यापक सतीश वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश मिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सहाय्यक शिक्षिका सौ. स्मिता डखरे व कु. ऋतुजा भारती यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाचा सोहळा, वारकऱ्यांची दिंडी, अभंग-भजनांच्या माध्यमातून सादर करत आषाढी वारीचा भक्तिरस अनुभव दिला. तर वर्ग चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर करत कार्यक्रमात रंगत भरली. या सांस्कृतिक महोत्सवाला पालक वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका मृणाल पाचखेडे व माधुरी लाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन लिना क्षीरसागर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राधा राऊत, राणी जवंजाळ, मनीषा बनकर, शारीरिक शिक्षक अजिंक्य मदन यांनी विशेष योगदान दिले. तसेच शालेय कर्मचारी अतुल राजगुरे, होमेंद्र भोयर, गोपाल मांडवेकर, बंडू गिरी, नलू जुनघरे, वंदना गावंडे व सुबोध पांडे यांनी मोलाची मदत केली.











