आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी : आर्वी–तळेगाव मेन रोडवरील सार्वजनिक रस्त्यावर असलेला ट्रान्सफॉर्मर सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करण्याबाबत संबंधित विभागाकडून निर्णय होऊनही आजपर्यंत सदर ट्रान्सफॉर्मर शिफ्ट करण्यात आलेला नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
या कामासाठी नेमण्यात आलेल्या संबंधित कॉन्टॅक्टरकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष व कामात मोठ्या प्रमाणात दिरंगाई करण्यात येत आहे. सदर रस्ता हा अत्यंत वर्दळीचा असून, ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी कधीही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असताना संबंधित कॉन्टॅक्टरकडून कोणतीही तत्परता दाखवली जात नाही. त्यामुळे सदर कामात निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित कॉन्टॅक्टरची तात्काळ चौकशी करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे तसेच ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंगचे काम विलंब न करता तात्काळ पूर्ण करण्यात यावे तरी आपण या गंभीर विषयाची दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी त्वरित आदेश द्यावेत असे संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत आर्वीकर नागरिकांनी मागणी केली.









