बिबट्याने केली गाईची शिकार; ढाकुलगाव शेतशिवारात भीतीचे वातावरण

0
55

धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे तालुक्यातील ढाकुलगाव शेतशिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी बिबट्याने एका शेतकऱ्याच्या गाईवर हल्ला करून तिची शिकार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शेतकरी व मेंढपाळ वर्गात भीती पसरली असून नागरिक सतर्क झाले आहेत.

शेतशिवारालगत असलेल्या झुडपांच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे. जनावरे चरायला सोडणे तसेच शेतात जाणे धोकादायक ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही दिवसांपासून बिबट्याचे पायांचे ठसे आढळून आले होते; मात्र प्रत्यक्ष शिकार झाल्याने भीती अधिकच वाढली आहे.

या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा बसवावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तसेच परिसरात वन विभागाने गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी व मेंढपाळांनी रात्रीच्या वेळी एकटे जाणे टाळावे तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad