राष्ट्रीय सेवा योजना समाजसेवेचे एक प्रभावी माध्यम प्राचार्य डॉ. शरद नायक यांचे वक्तव्य.
(धामणगाव रेल्वे वार्ताहर )
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा यांचे विशेष निवासी शिबिर दत्तक ग्राम मंगरूळ दस्तगीर येथे दिनांक 18/1/2026 ते दिनांक 25/1/2026 दरम्यान विविध उपक्रमाद्वारे श्री संत लहानुजी महाराज मंदिर शहीद भगतसिंग चौक येथे संपन्न होत आहे. शिबिराची थीम पाणलोट व्यवस्थापन आणि पडीक जमीन विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून शाश्वत विकासासाठी युवकांचे योगदान ही असून शिबिराचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा गिरीश सूरोसे, उपसरपंच ग्राममंगरूळ दस्तगीर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रमोद आंबटकर, विजय मेश्राम, नितीन कुर्तडकर, विजय निमकर, प्रमोद गुल्हाने, राहुल ठाकरे, सचिन कडू, डॉ. मेघा सावरकर ,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद नायक, राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा.दीपक बोंद्रे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. पवन शिवनकर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते फीत कापून राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे रीतसर उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते परमहंस सद्गुरु शंकर महाराज डॉ. पंजाबराव देशमुख,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो चे पूजन व हार अर्पण करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे शाल, श्रीफळ व फुलांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व राष्ट्रीय सेवा योजना लक्ष गीत सादर केले. यावेळी प्रा दीपक बोंद्रे यांनी प्रास्ताविक करून शिबिरामध्ये आयोजित कार्याचा आढावा सादर केला. प्रमुख अतिथी श्री प्रमोद आंबटकर व प्रमोद गुल्हाने यांनी राष्ट्रीय सेवेच्या माध्यमातून स्वयंसेवकांचा बौद्धिक शारीरिक व संघटनात्मक विकास होऊन त्यांचे मध्ये वेळेचे नियोजन नेतृत्व गुण व सामाजिक बांधिलकी निर्माण होते असे मत यावेळी व्यक्त केले. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शरद नायक यांनी शासनाद्वारे विविध महाविद्यालयात स्थापन केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे कार्य व उद्देश तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास समजावून सांगितला. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच समाजसेवेची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक असून राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाशी जोडणारी प्रभावी चळवळ असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात उपसरपंच गिरीश सुरवसे यांनी या शिबिरातील सात दिवस आयोजित कार्यक्रमाचे माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव दृढ होऊन राष्ट्रसेवेची भावना अधिक बळकट होईल असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्वल भुजाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन कुमारी गौरी मानकर हिने केले.
राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरामध्ये सात दिवस प्रा. विशाल मोकाशे, हनुमंत ठाकरे, डॉ.मेघा सावरकर,प्रा. रेवती वाघाडे ,रमेशराव साखरकर,श्री दिलीपराव महल्ले, मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन यांचे द्वारा विविध विषयावर बौद्धिक व्याख्याने व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे हुंडाबळी, नारी सक्षमीकरण, रस्ते सुरक्षा जनजागृती, यांचे वर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांसाठी बौद्धिक खेळ, महिलांसाठी हळदीकुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच शोष खड्डे तयार करणे, ग्राम स्वच्छता अभियान व एड्स, जल संवर्धन, वृक्ष लागवड मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन, रक्तदान शिबिर, रोगनिदान शिबिर, अस्थिरोग शिबिर, शल्य चिकित्सा, नेत्र तपासणी, महिला आरोग्य शिबिर, इत्यादींचे आयोजन राजेंद्र गोडे मेडिकल हॉस्पिटल, अमरावती व श्री.बुधाजी महाराज ग्रामीण रुग्णालय, पिंपळखुटा यांचे द्वारे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम, हागणदारी मुक्त गावाचा सर्वे, चित्रकला स्पर्धा, आदी उपक्रम संपन्न होणार आहे.
राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरातील सर्व उपक्रमांचे यशस्वी नियोजनासाठी मंगरूळ दस्तगीर ग्रामचे सरपंच श्री. सतीश हजारे, उपसरपंच श्री गिरीश सुरोसे, तसेच ग्राम पंचायत सदस्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ संदीप हाडोळे, महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. नंदूशेठ चव्हाण, स्थानिक व्यवस्थापन समिती पदाधिकारी महादेवराव शिवनकर, एडवोकेट प्रकाशराव देशमुख, प्राचार्य डॉ. शरद नायक ,प्रा पवन शिवणकर , सुहास आप्तूरकर, प्रमोद आंबटकर, विजय मेश्राम, प्रफुल्ल डाफ,श्री निवल ,सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, गटप्रमुख साक्षी कांबडी ,अनिकेत बाभुळकर, व सर्व स्वयंसेवकांचे सहकार्य लाभत आहे.















