छत्रपती संभाजीनगर | दि. 27 मे 2025
छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ला.प्र.वि.) युनिटने मोठी धडक कारवाई करत जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना ५ लाख रुपये लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
तक्रार आणि लाच मागणीचा प्रकार
तक्रारदार (वय ४९) आणि त्यांच्या पार्टनर यांनी मौजे तिसगाव, गट क्र. 225/5 मधील ६ एकर १६ गुंठे वर्ग २ ची जमीन २०२३ मध्ये शासनाच्या परवानगीने कायदेशीर रितीने खरेदी केली होती. ही जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या अधिकृत चलनासाठी महसूल सहाय्यक श्री. दीपक त्रिभुवन (वय ४०) आणि निवासी उपजिल्हाधिकारी श्री. विनोद खिरोळकर (वय ५१) यांनी तक्रारदारांकडून १८ लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
दि. २६/०५/२५ रोजी झालेल्या पडताळणीमध्ये आरोपी आणि तक्रारदार यांच्यात ५ लाख रुपये प्रथम आणि फाईल पूर्ण झाल्यानंतर उर्वरित १३ लाख रुपये देण्याचे ठरले होते.
सापळा कारवाई
दि. २७/०५/२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर त्रिभुवन यांना तक्रारदाराकडून ५ लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, तर खिरोळकर यांनाही स्वतंत्र पथकाने तत्काळ अटक केली. दोघांची अंगझडती घेतली असता, त्रिभुवन यांच्याकडे सॅमसंग मोबाईल आणि ३,००० रुपये, तर खिरोळकर यांच्या केबिनमध्ये ७५,००० रुपये रोख आणि आयफोन १५ प्रो मॅक्स सापडला.
अधिकार्यांना लाज वाटावी अशी घटना!
लोकसेवेच्या शपथेवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनीच सामान्य जनतेकडून लाखो रुपयांची लाच मागणे ही केवळ कायद्याचा भंग नाही, तर संपूर्ण प्रशासन व्यवस्थेची बदनामी करणारी बाब आहे. ‘लोकसेवक’ म्हणून ओळखले जाणारे हे अधिकारी प्रत्यक्षात ‘लाचखोर’ ठरले. जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या जबाबदारीच्या ठिकाणी बसून त्यांनी जनतेच्या विश्वासाला तडा दिला आहे.
ही केवळ लाचखोरी नव्हे, तर जनतेच्या कष्टाचं, विश्वासाचं आणि आशेचं पद्धतशीर शोषण आहे. अशा अधिकाऱ्यांना प्रशासनात राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही.
गुन्हा दाखल आणि अधिक तपास
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7(अ), 12 अन्वये सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाईचे नेतृत्व
ही सापळा कारवाई पो.नि. शांतीलाल चव्हाण, सहाय्यक पो.उपाधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे, पो.उपाधीक्षक दिलीप साबळे, पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद अघाव, आणि पो.उपाधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पोनि धस, पोनि दिंडे, पो.ह.सिनकर आणि इतर अधिकारी सहभागी होते.
जनतेस आवाहन
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांनी कोणताही शासकीय अधिकारी किंवा खाजगी व्यक्ती लाच मागत असल्यास खालील क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा:
टोल फ्री क्रमांक : 1064
पो.उप.अधीक्षक, ला.प्र.वि., छ. संभाजीनगर – 0240-2344050