धामणगाव रेल्वे | दि. 12 जानेवारी 2026 —
स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व युगप्रवर्तक विचारवंत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिन’ उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. संस्कार, राष्ट्रभक्ती आणि आत्मविश्वास यांचा संदेश देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका सौ. तृप्ती सुतोने यांनी अत्यंत प्रभावी व प्रवाही शैलीत केले.
विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारशील मातृत्वावर तसेच स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी विचारांवर आधारित मनोगत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

स्वामी विवेकानंद यांच्यावर प्रभावी भाषण चिरायु बानुडे (इयत्ता ६ वी अ) या विद्यार्थ्याने सादर केले. तसेच अन्वी चौधरी (इयत्ता ६ वी अ) हिने राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत भूमिका साकारून आपल्या विचारांनी कार्यक्रमात रंगत भरली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून हिंदी विषयाच्या शिक्षिका सौ. उज्वला गावंडे उपस्थित होत्या. तसेच सिन्नी के. सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या आकर्षक आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी सांगितले की, “राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांतून घडलेले छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखे आहेत.”
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उपस्थितांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.
















