चांदूर रेल्वे :- महाराष्ट्रातील विदर्भात प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने भव्य गुढीपाडवा–रामनवमी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि.१८ मार्च ते २७ मार्च २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडणार असून लाखो भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला महाराजांच्या झेंड्यांचा चित्तथरारक व नेत्रदीपक सोहळा गुढीपाडव्याच्या दिवशी दि.१९ मार्च (गुरुवार) रोजी दुपारी सुमारे ४ वाजता पार पडणार आहे. अखंड कापूर ज्योती, बासन (टाळ)ढोलकी (मृदंग)चा गजर,हजारोच्या संख्येने नगरीत आलेल्या अवधूत भजन मंडळाच्या मांडीचे सुमधूर गायनात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडतो. शेकडो क्विंटल कापूर विक्रीचा अंदाज असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाणार आहे.
संस्थानचे विश्वस्त चरणदास नामदेवराव कांडलकर यांच्या शुभहस्ते महाराजांच्या बोहलीचे विधीवत पूजन करून दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ (कापड) चढविण्यात येणार आहे. झेंड्यांना पायाचा स्पर्श होऊ नये म्हणून दोरांच्या सहाय्याने झेंड्यांची जुनी खोळ काढून नविन खोळ चढवली जाते. हा सोहळा विश्वस्त मंडळ व लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडणार आहे. अवधूत संप्रदायातील भाविकांनी गावोगावी स्वयंप्रेरणेने यात्रेचे बॅनर लावून वातावरण निर्मिती केली आहे.
महोत्सवाची सुरुवात दि. १८ मार्च (बुधवार) रोजी अमावस्या निमित्त सायंकाळी ५ वाजता चंदन-उटी व रमणा कार्यक्रमाने होणार आहे. त्याच दिवशी सकाळी ७ ते १० या वेळेत मंदिर व ग्राम परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
यात्रेदरम्यान भाविकांच्या सोयीसाठी संस्थानतर्फे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कडाक्याच्या उन्हाचा विचार करून दर्शन मंडपावर हिरवी नेट टाकून सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे.संस्थानचे वतीने पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून टॅंकर द्वारे पाणी पुरवठा,अन्नदान, तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी गावाबाहेरील संस्थानचे अधिकृत मंडपात प्रसादाची(अन्नदान) व्यवस्था करण्यात आली आहे. भजनासाठी येणाऱ्या अवधूत भजन मंडळांसाठी व भाविकांसाठी (प्रसादालयाचे मागील शेतात) संस्थानचे वतीने भव्य मंडपात बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क आणि दक्ष राहणार आहे.
आतापर्यंत झेंडे चढविताना दर्शन बंद ठेवण्याची प्रथा होती; मात्र मागील वर्षापासून झेंड्यांची खोळ चढवितानाही दर्शन सुरू ठेवण्यात येत असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे.
दि.२० ते २७ मार्च २०२६ या कालावधीत दररोज अवधूत नामप्रचारक महाराजांच्या गाथेतील ओव्यांवर आधारित प्रवचने आयोजित करण्यात आली आहेत.
दि.२६ मार्च (गुरुवार) रोजी रामनवमी निमित्त चंदन-उटी व रमणा, तर दि. २७ मार्च रोजी चैत्र मांडी वाढवा,बाहेर गावातील सहभागी अवधूत भजन मंडळासह रमणा पालखी व ढालीचा सोहळा व निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ आणि भाविकांसाठी भव्य महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.
गुढी पाडव्याचे दिवशी यात्रेत बाहेरगावाहून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी संस्थानची अन्नदान समिती आणि सेवाभावी मंडळाचे वतीने प्रसाद(अन्नदान) व्यवस्था करण्यात आली आहे.
आग सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांनी कापूर सुरक्षित अंतर ठेवून आणि कमी प्रमाणात जाळावा,तलावात गाळ असल्यामुळे जिवीत हाणी टाळण्यासाठी अनओळखीचे पाणी क्षेत्रात कोणीही आंघोळ करू नये,यात्रेचे गावातील नदीवरील पुल व गावात येणारे सर्व रस्ते नादुरुस्त आणि अपघातग्रस्त असल्यामुळे वाहन सावकाश चालवावे,यात्रेत मौल्यवान दागिने घालून येवू नये,भाविकांनी खिसे कापू पासून सावध रहावे,भाविकानी अवैध वाहनाने प्रवास न करता अमरावती,चांदुर रेल्वे, बडनेरा,नेर(परसोपंत) आगरातील एस्.टी. यात्रा-बसने सुरक्षित प्रवास करावा.तसेच भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,या यात्रा महोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शांतता, सुव्यवस्था व स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन श्री विठोबा संस्थान विश्वस्त मंडळ:अध्यक्ष पुंजाराम नेमाडे,उपाध्यक्ष कृपासागर राऊत,सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील,गोविंद राठोड,फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर,प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड,वैभव मानकर,स्वप्नील चौधरी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.













