प्रतिनिधी | धामणगाव रेल्वे
झारखंड राज्यातील नक्षलवाद्यांविरोधातील धाडसी कारवाईदरम्यान गंभीर जखमी झालेले सीआरपीएफचे कोब्रा कमांडो दिनेश राऊत यांचे उपचारानंतर मायभूमीत आगमन झाले असून, धामणगाव रेल्वे येथे त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून देशभक्तीचा उत्साह व्यक्त केला.
“देशसेवा हेच माझे कर्तव्य असून, शेवटच्या श्वासापर्यंत मी भारतमातेची सेवा करत राहणार,” अशी भावना दिनेश राऊत यांनी व्यक्त केली.
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील चाईबासा परिसरातील घनदाट जंगलात नक्षलवाद्यांविरोधात विशेष सर्च ऑपरेशन सुरू होते. सलग पाच दिवस जवानांनी प्रतिकूल परिस्थितीत मोहीम राबवली. 29 फेब्रुवारी रोजी सर्च दरम्यान जवानांनी दोन आयईडी निकामी करण्यात यश मिळवले. मात्र त्यानंतर नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला चढवला.

दरम्यान, एका आयईडीवर पाय पडल्याने भीषण स्फोट झाला आणि दिनेश राऊत गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली असतानाही त्यांनी धैर्याने परिस्थितीचा सामना केला. सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना जंगलातून बाहेर काढून हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात हलविले.
जवळपास एक महिन्याच्या उपचारानंतर ते बरे होऊन आपल्या गावी परतले. त्यांच्या आगमनावेळी धामणगाव रेल्वे येथे ढोल-ताशे, फटाके आणि फुलांच्या वर्षावात त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. परिसरात सर्वत्र आनंद आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले.
स्फोटाच्या वेळी पाठीवरील पिशवीमुळे मोठा अनर्थ टळल्याची माहिती समोर आली आहे. या पिशवीमुळे डोक्याला गंभीर इजा झाली नाही. मात्र पायाला गंभीर दुखापत झाली होती. सहकाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि त्वरित उपचारांमुळे त्यांचा जीव वाचला.


















