तळेगाव दशासर येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी संघाची औपचारिक स्थापना करण्यात आली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
शाळेसंदर्भातील विकासात्मक दृष्टीकोन, शैक्षणिक गुणवत्ता वाढ, पायाभूत सुविधा बळकटीकरण तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या हेतूने झालेल्या बैठकीत सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या एकमताने तुषार धनजोडे यांची माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून शाळेच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असून शिक्षक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद व ग्रामस्थांची उपस्थिती होती.













