धामणगाव रेल्वे:
स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. भारताचे संविधान स्वीकारलेल्या या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विविध ज्ञानवर्धक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर संविधानाची प्रस्तावना वर्ग सातवी (ब) ची विद्यार्थिनी भुवी बमनोटे हिने अत्यंत प्रभावीपणे वाचून दाखवली. प्रस्तावना वाचनातून राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचा सशक्त संदेश देण्यात आला.
यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि लोकशाही तत्त्वे यांवर आधारित सादरीकरणे करून संविधानाचा अभ्यास अधिक सखोल, प्रभावी आणि समजण्यास सोप्या पद्धतीने मांडला.
विशेष सादरीकरणांमध्ये वर्ग चौथीचा विद्यार्थी मल्हार पोकळे याचे आकर्षक सादरीकरण आणि भुवी बमनोटे हिच्या उद्देशिकेच्या उत्कृष्ट वाचनाने उपस्थितांची दाद मिळवली. त्यांच्या सादरीकरणातून लोकशाही, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या संविधानिक मूल्यांचे जिवंत दर्शन घडले.
प्राचार्या श्रीमती प्रचिती धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले,
“संविधान ही आपल्या लोकशाहीची भक्कम पायाभरणी आहे. विद्यार्थी संविधानातील मूल्ये आचरणात आणतील तेव्हाच ते आदर्श नागरिक म्हणून घडतील. हीच संविधानाला खरी आदरांजली ठरेल.”
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवर्ग, प्रशासकीय अधिकारी श्री. प्रितेश जणवाडे, तसेच सर्व कर्मचारीवर्ग यांनी मनापासून सहकार्य केले.
संपूर्ण शाळा परिसर संविधानाबद्दलचा अभिमान आणि देशभक्तीची भावना यानी भारून गेला होता.













