वाहनांना नवीन नंबर प्लेट बसविण्याचे आवाहन 31 मार्चपर्यंत मुदत

0
80
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 27 : केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार राज्य शासनाने सर्व वाहनांना हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसविण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार वाहनधारकांनी 31 मार्च पूर्वी नंबर प्लेट बसवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यासाठी एजंसी निश्चित करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबर प्लेटसाठी बुकींग करण्यासाठी mhhsrp.com पोर्टल निश्चित करण्यात आले आहे. वाहनधारकांनी पोर्टलवर बुकींग करून त्यांच्या सोईप्रमाणे अपॉइंटमेंट घेऊन एचएसआरपी नंबर प्लेट दि. 31 मार्च 2025 पूर्वी बसवून घेण्यात यावी. वाहनधारक अमरावती कार्यालयातील नोंदणीधारक नसला तरी अमरावतीमध्ये वाहन वापरत असल्यास वाहनास एचएसआरपी नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे.

एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी दुचाकी, ट्रॅक्टरसाठी 450 रूपये, तीनचाकीसाठी 500 रूपये, इतर सर्व वाहनांसाठी 745 रूपयांप्रमाणे जीएसटी वगळून शुल्क आकारण्यात येणार आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याबाबत तक्रारी असल्यास संबंधित सेवापुरवठा धारकांच्या पोर्टल, तसेच अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयात तक्रार दाखल करू शकतील.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च्‍ न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांनी वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या वाहनावर एचएसआरपी नंबर प्लेट बसविली नसल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे, उतरविणे, दुय्यम प्रत, विमा अद्यावत करणे आदी कामकाज थांबविण्यात येणार आहे. एचएसआरपी नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

veer nayak

Google Ad